दंगली घडवायच्या आहेत का?, आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करू नका, जरांगेंचा सरकारला इशारा

Gramin Varta
4 Views

सरकारला मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी १२ सप्टेंबरपर्यंत वेळ;मुंबईकडे जाण्याच्या तयारीचे संकेत

जालना: सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम सुरु आहे. आम्ही सांगितलं सगळ्या मसुद्याची अंमलबजावणी करा.यांना आंदोलन मोडून काढायचं आहे. दंगली घडवायच्या आहेत का? काम कमी करायचं आणि दुसऱ्या जातींना डाग लावायचा. नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे असं सुरू आहे, अशी नाराजी व्यक्त करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करू नका, अशा इशारा मनोज जरांगे यांंनी सरकारला दिला आहे. सरकारला मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी १२ सप्टेंबरपर्यंत वेळ असल्याचे सांगत, त्यानंतर मुंबईकडे जाण्याच्या तयारीचे संकेत जरांगे यांनी दिले. मी मुंबईला जायला सज्ज होतो, असे सांगतानाच, सध्या सुरू असलेले उपोषण कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंतरवाली सराटी (जि. जालना) या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जरांगेंची तब्येत खालावण्यास सुरूवात झाली आहे. काल सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले होते. जरांगेंनी मराठा आरक्षणाची प्रमाणपत्रे तातडीने वाटण्यास सुरुवात करण्याची मागणी केली आहे. मात्र अजूनही याबाबतच्या कार्यवाहीला सुरूवात झालेली नाही. यानंतर आत मनोज जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिला आहे.

सरकारने दिलेला मसुदा मान्य आहे का? यावर बोलताना जरांगेंनी म्हटले की, मी वाचला नाही. तुम्ही माणसाची तब्येत खराब होण्याची वाट पहा. तुम्ही माणसं बेशुद्ध पडल्यानंतर येणार आणि वाचला का विचारणार. नीच अवलादी आहेत. मराठे चवताळले तर तुम्हाला हाताखालून काढतील. मुंबईतही हेच होईल. हे वारंवार मला विचारतात, बहुतेक यांच्या डोक्यात वेगळंच काहूर आहे. यांनी आमचा एक माणूस मारला की आम्ही यांचा एक माणूस मारणार, यांचं मोठं षड्‍यंत्र आहे. तिथे बसून भजे कुरडाया खातात. तुम्ही किती नीच आहात रे. आमच्या जातीचे असूनही तुम्ही नीच आहात. आपण कुणालाही हात लावायचा नाही. यांना फक्त हात लावू द्या. यांच्या डोक्यात दंगल घडवायची असेल तर मी उपोषण सोडून देईन आणि टप्पू गोटे घेऊन व्यासपीठावर बसेल, असेही जरांगे म्हणाले.

जरांगे म्हणाले, सध्या ‘उंटावरून शेळ्या हाकण्याचे’ काम सुरू आहे. सरकारने आंदोलनस्थळी येऊन केवळ चर्चा करण्यापेक्षा मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा. सातारा आणि कोल्हापूर संस्थान संदर्भातील जीआर काढावेत. सारथी आणि महामंडळाचे परतावे द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली. मराठा समाजाला सरकार फसवणार असल्याचा आरोप करत, मराठ्यांसह ओबीसी समाजालाही फसवले जात असल्याचे जरांगे म्हणाले. सर्व जातींनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ‘तुम्हाला जीआर काढायचे असतील तर काढा. त्यात काही चूक झाली तर सुधारित जीआर काढा. गावोगावी कॅम्प लावा आणि जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करा. सातारा आणि कोल्हापूर संस्थानचा मसुदा अद्याप देण्यात आलेला नसल्याचा आरोप करत, चार प्रमाणपत्रांचा मुद्दा आधी मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विचारले असता, त्यांच्या राजकारणाशी आपल्याला काहीही देणेघेणे नसल्याचे जरांगे यांनी सांगितले. सरकारने मागण्यांवर निर्णय घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महसूलमंत्री किंवा सरकारमधील नेत्यांकडून ‘चांगला प्रतिसाद’ मिळत असल्याच्या दाव्यांवरही जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘चांगला प्रतिसाद म्हणजे काय? मराठ्यांचा अवमान होणार असेल तर जाऊ द्या. सरकारला यायचे असेल तर सगळे जीआर घेऊन या; अन्यथा येऊ नका,’ असे ते म्हणाले. शरद पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली. ‘त्यांनी आमचे वाटोळे केले; तुम्ही काय कमी केले का? आता तुम्ही शिफारस करा, कुणाकडे बोट दाखवू नका,’ असे जरांगे म्हणाले.

जरांगे यांच्या प्रमुख मागण्या

सगळ्या मसुद्याची तातडीने अंमलबजावणी करावी.

रद्द केलेली चार जात प्रमाणपत्रे वैध करावीत.

५८ लाख नोंदींच्या आधारे आजपासून जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करावे.

हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करावे.

सातारा आणि कोल्हापूर संस्थानसंदर्भातील जीआर काढावेत.

ईसीबीसीच्या माध्यमातून नियुक्त्या झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात.

सारथी व संबंधित महामंडळांचे परतावे द्यावेत.

गावोगावी कॅम्प लावून जात प्रमाणपत्रांचे वाटप करावे.

सरकारने चुकीचा जीआर काढला तरी आवश्यकतेनुसार सुधारित जीआर काढावा.

- Advertisement -
Total Visitors :
4796790
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *