मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कुरार परिसरात समोर आली आहे. पीडित मुलीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपी प्रियकराने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पीडित मुलगी अंधेरी परिसरातील रहिवासी असून सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. आरोपी तिच्या परिचयातील असून तो मालाड येथील पठाणवाडी परिसरात राहत असल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडिता १६ वर्षांची असताना आरोपीने तिला बॉयोलॉजीच्या नोट्स घेण्यासाठी आपल्या मालाड येथील घरी बोलावले होते. त्यानुसार ती त्याच्या घरी गेली होती.
घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पीडितेला प्रपोज करून तिच्यासमोर लग्नाची मागणी घातली. लग्न करण्याचे आश्वासन देत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पुढील काळातही लग्नाचे आमिष दाखवून आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पीडितेने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, यावेळी आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. लग्नाचे स्वप्न दाखवून जवळीक साधणाऱ्या प्रियकराने अचानक लग्नास नकार दिल्यानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सोच्या विविध कलमांसह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पसार आरोपीचा शोध सुरू आहे.





