तुळजापूर : नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात तीन मुलांसह बुरुजावरून उडी घेतलेल्या नॅशनल लेव्हलच्या कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांच्या मृत्यूप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. अश्विनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या आत्यासासूविरुद्धही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
निलंगा तालुक्यातील पौळ अंबुलगा येथील रहिवासी असलेल्या अश्विनी पौळ या एमएसएफच्या माजी कर्मचारी होत्या. गुरुवारी दुपारी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग किल्ल्यातील सुमारे 100 फूट खोल उपळी बुरुजावरून त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना खाली ढकलले आणि त्यानंतर स्वतःही उडी घेतली. या घटनेत अश्विनी यांच्यासह दोन मुलांचा मृत्यू झाला, तर अडीच वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.
अश्विनी पौळ या राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळलेल्या कुस्तीपटू होत्या. त्यांच्या नावावर पाच सुवर्ण आणि सहा रौप्यपदके असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वैवाहिक आयुष्यातील कथित छळामुळे त्यांचे जीवन टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्यांकडून करण्यात आला आहे.
अश्विनीचे वडील तानाजी मोहिते हे शिक्षक आहेत. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत सासरच्यांकडून अश्विनीचा सातत्याने छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या त्रासाला कंटाळून अश्विनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी माहेरी आल्या होत्या आणि त्यानंतर त्या मुलांसह माहेरीच राहत होत्या. मात्र, माहेरी आल्यानंतरही पतीकडून फोनवरून तिला त्रास दिला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात अश्विनीची सासू, सासरे आणि पती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर आत्यासासूचाही या प्रकरणात समावेश करण्यात आला आहे. पौळ कुटुंबाच्या संसारात आत्यासासू हस्तक्षेप करत असल्याचा आरोप समोर आला असून, त्याआधारे तिच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
अश्विनी या एमएसएफमध्ये कार्यरत होत्या. मात्र, सुमारे चार महिन्यांपूर्वी पतीच्या सांगण्यावरून त्यांनी नोकरी सोडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्या गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मुलांसह माहेरी राहत होत्या. माहेरी आल्यानंतरही त्यांना सातत्याने फोन करून मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ‘तुला जगू देणार नाही,’ अशा स्वरूपाच्या धमक्या फोनवरून दिल्या जात असल्याचेही वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांत अश्विनीवर पुन्हा काहीतरी दबाव किंवा मानसिक त्रास निर्माण झाला असावा, असा संशयही त्यांच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. मागील आठ दिवसांत मुलीला काहीतरी सांगितले किंवा तिच्यावर दबाव आणला गेला असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अश्विनीच्या मृत्यूने पौळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आत्यासासूसह अन्य आरोपींविरोधातील गुन्ह्यात नेमकी कोणती भूमिका होती, तसेच अश्विनीच्या मृत्यूमागील परिस्थिती काय होती, याचा तपास झाल्यानंतरच या धक्कादायक प्रकरणातील संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी मारुन स्वत:सह लेकरांना संपवणाऱ्या अश्विनी पौळ प्रकरणात मोठी अपडेट
Leave a Comment





