आंबा घाटातील विसावा पॉईंटजवळ पुन्हा रस्ता खचला; एकेरी वाहतूक सुरू

Gramin Varta
160 Views

कोल्हापूर : रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात ओझरेखिंड आणि विसावा पॉईंटदरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेने पुन्हा गंभीर स्वरूप धारण केले आहे. विसावा पॉईंटजवळ आणखी एका ठिकाणी रस्ता खचला असून सुमारे ५० फूट लांबीचा संरक्षक कठडा खोल दरीत कोसळला आहे. त्यामुळे रस्त्याची बाजूची पट्टीही दरीत खचल्याने वाहनचालकांसमोर अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी ओझरेखिंड परिसरात संरक्षक भिंत कोसळून रस्त्याला मोठा तडा गेला होता. त्यानंतर आता विसावा पॉईंटजवळ रस्ता खचल्याने आंबा घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित ठिकाणी बॅरिकेट्स लावून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, केवळ बॅरिकेट्स लावून वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक ठरत असल्याची नाराजी वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.
नव्याने खचलेल्या वळणावर स्वतंत्र पथक नियुक्त करण्याची मागणीही वाहनधारकांकडून होत आहे. ओझरेखिंड येथे एसटी महामंडळ आणि वाहतूक पोलिसांचे पथक गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीवर नियंत्रण ठेवत आहे. मात्र, धोकादायक ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे.

रस्ता खचल्याने काही ठिकाणी उपलब्ध रस्त्याची रुंदी अवघी आठ फूट राहिली असून त्यावरून एसटी बस, चारचाकी तसेच अन्य वाहने मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देतानाही मोठा धोका निर्माण होत आहे. पावसामुळे मातीची धूप वाढत असून दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे रात्रीच्या वेळी हा धोका आणखी वाढतो.

केवळ तात्पुरती डागडुजी न करता प्रशासनाने तातडीने संरक्षक बांधकाम हाती घेऊन कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, विशेष काळजी घ्यावी आणि मुसळधार पाऊस किंवा दाट धुक्याच्या काळात शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Total Visitors :
4819880
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *