मुंबई : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात ३० जुलै २०१४ रोजी घडलेल्या भीषण माळीण दरड दुर्घटनेची वेदनादायी आणि हृदयद्रावक कहाणी आता ‘एक होतं माळीण’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तब्बल १५० हून अधिक नागरिकांचा बळी घेणाऱ्या आणि संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या दुर्घटनेवर आधारित हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी राज्यभर प्रदर्शित होत आहे.
मुसळधार पावसामुळे दरड कोसळून संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाल्याची ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींमध्ये गणली जाते. या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ‘एक होतं माळीण’ या चित्रपटात त्या काळातील वास्तव, मानवी वेदना, संघर्ष आणि भावनिक क्षण प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, माळीण गावाचा उभारलेला भव्य सेट आणि वास्तवदर्शी दृश्यरचना ही चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनचे संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्ता गायकर आणि राजू राणे हे सहनिर्माते आहेत. रॅन स्टुडिओज प्रोडक्शनच्या माध्यमातून नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे आणि राजू राणे यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची संकल्पना, कथा आणि पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक आणि अनुज ठाकरे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन केले असून युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केले आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांच्या आवाजातील गीतेही चित्रपटाचे आकर्षण ठरणार आहेत. कला दिग्दर्शन नितेश नांदगावकर यांनी तर व्हीएफएक्सची जबाबदारी रहमान अब्दुल्ला यांनी सांभाळली आहे. महेश भारंबे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
विशेष म्हणजे चित्रपटाचे कथानक अधिक वास्तववादी करण्यासाठी दिग्दर्शक राजू राणे यांनी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून दुर्घटनेविषयी सविस्तर माहिती संकलित केली आहे. त्यामुळे या चित्रपटातून केवळ एक दुर्घटना नव्हे, तर त्या घटनेमागील मानवी भावना, संघर्ष आणि वेदनादेखील प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा असून २४ जुलै रोजी ‘एक होतं माळीण’ हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा आणि हृदयस्पर्शी अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे.
माळीण दुर्घटनेची वेदनादायी कहाणी मोठ्या पडद्यावर; ‘एक होतं माळीण’ २४ जुलैला प्रदर्शित
Leave a Comment
