रत्नागिरी: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला रत्नागिरी जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला असला तरी, तांत्रिक त्रुटी आणि पात्रतेच्या निकषांमुळे जिल्ह्यातील १ लाख ५ हजार ५२१ महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ७७ हजार ४७७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी मागील महिन्यात २ लाख ७१ हजार ९५६ पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर योजनेचा लाभ यशस्वीरीत्या जमा करण्यात आला आहे.
महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेमध्ये अर्जामधील त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने ई-केवायसी वेळेत पूर्ण न करणे, बँक खात्याशी जोडलेला आधार क्रमांक चुकीचा असणे, संजय गांधी निराधार योजना किंवा इतर शासकीय मानधन योजनांचा लाभ घेणे, शासकीय नोकरीत असणे, कुटुंबात चारचाकी वाहन असणे, कुटुंबातील सदस्य करदाता असणे, वयोमर्यादेचे उल्लंघन, अर्जात पुरुष किंवा तृतीयपंथी सदस्यांची नोंद असणे, तसेच काही महिलांनी स्वतःहून लाभ बंद करण्याची विनंती करणे अशा विविध कारणांमुळे हे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. योजनेचा लाभ गरजू आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, त्रुटी असलेल्या अर्जांच्या दुरुस्तीबाबत संबंधित यंत्रणेकडून कार्यवाही केली जात आहे.





