Category: बातम्या

  • देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबईत – मंत्री ॲड. आशिष शेलार

    देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबईत – मंत्री ॲड. आशिष शेलार

    मुंबई: जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. 21 जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे सायंकाळी 4.30 वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे.

    मराठी भाषा आणि कलाकारांसाठी नवे व्यासपीठ

    रेडिओ क्षेत्राला गौरव प्राप्त करुन देणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. राज्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपण्याचे काम रेडिओमार्फत झाले आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती रेडिओमार्फत जतन करण्यात आल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे. महाराष्ट्रात आकाशवाणीनेही भूमिका निभावली आहे. तसेच खासगीकरण आणि आधुनिकीकरणाच्या काळात खासगी एफएम चॅनेल आणि कम्युनिटी रेडिओनेही भूमिका अधोरेखित केली आहे. मराठी संगीत, गाणी, शास्त्रीय संगीत जपणारे, उद्यमशील आणि सृजनशील रेडिओ चॅनलला प्रोत्साहन मिळावे यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. मराठी निवेदक, मराठी अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक, तंत्रज्ञ, संपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कला, साहित्य, संस्कृतीचे जतन करण्यात यावे. तसेच ज्या रेडिओच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन, राजकारण, सामाजिक जाणीव यासाठी भरीव योगदान दिले जात आहे. त्यांना या माध्यमातून योग्य सन्मान देण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील दिग्गज असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण आशा भोसले’ यांच्या नावाने देण्यात येणार आहे. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदान लक्षात घेता हे नाव देण्याचे शासनाने निश्चित केल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

    महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार

    आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडिओ निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मराठी निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम आणि आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम अशी या पुरस्कारांची नावे असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार हे नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात येतील. यासाठी संबंधित कलाकार तंत्रज्ञ रेडिओ केंद्र यांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करावी लागेल. मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. यासाठी रेडिओ क्षेत्रातील तज्ज्ञ कलाकार, तंत्रज्ञ, अभ्यासक यांसारख्या शासकीय सदस्यांच्या माध्यमातून पुरस्कारमूर्तींची निवड करण्यात येईल, असे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

    या पुरस्कार सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री रेडिओ निवेदकांसोबत संवाद साधणार आहेत तर दुसऱ्या भागामध्ये रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्याच्या पार्श्वभूमीत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी किस्से यांचे सादरीकरण प्रथितयश कलाकारांच्या माध्यमातून होईल. सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे अशा नावाजलेल्या कलाकारांच्या सादरीकरणातून सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून सन्मानिका सांस्कृतिक कार्य संचालनालयात दिनांक १९ पासून उपलब्ध होतील. सर्व रेडिओप्रेमींनी आणि रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक मंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.

    रेडिओचे योगदान

    ‘आकाशवाणी’ हे एक लोकप्रसारणाचे महत्त्वाचे माध्यम म्हणून गणले गेले आहे. १९२७ सालापासून सुरू झालेल्या आकाशवाणीने भारताच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठी भर घातलेली आहे. जनसंवादाचा आणि जनसंपर्काचा ‘मास मीडिया’ म्हणून ओळखले जाणारे आकाशवाणी हे भारतीय माध्यमाचे एक अविभाज्य अंग आहे. आकाशवाणीमुळे अनेक कलाकार घडले असून, अनेक कलाप्रकारांना प्रोत्साहन आणि संरक्षणही मिळाले आहे. नवमाध्यमांच्या आक्रमणात व नवमनोरंजनाच्या या काळात आकाशवाणीनेही कालसुसंगत परिवर्तन केले आहे. आजही ग्रामीण भागात आकाशवाणीच्या कार्यक्रमांना मोठी पसंती मिळत असते.

    महाराष्ट्रात आज घडीस ऑल इंडिया रेडिओची २८ केंद्रे, एफएम रेडिओची सोळा केंद्रे आणि ५४ कम्युनिटी रेडिओची केंद्रे हे काम करत आहेत. रेडिओ सिटी, रेडिओ वन, मॅजिक एफएम, माय एफ एम, टोमॅटो एफ एम, अशी विविध एफ एम चॅनल्स सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर विविध संस्थांची विविध कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सही सुरू आहेत.

    रेडिओ महोत्सवामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसिद्धीस मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल. मराठीसाठी काही पुरस्कार राखीव असल्यामुळे मराठी कलाकार आणि मराठी भाषा यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा राहणार आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एफएम रेडिओ व कम्युनिटी रेडिओने मराठी भाषेच्या प्रचाराच्या प्रसिद्धीसाठी उल्लेखनीय काम केलेले आहे. अनेक मराठी कलाकारांना रेडिओमुळे नाव मिळालेले आहे. रेडिओ या सशक्त माध्यमाची दखल घेणे, सांस्कृतिक कार्य विभाग व पर्यायाने राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम यांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी रेडिओ माध्यमांचा वापर करणे हा या महोत्सव व पुरस्काराचे आयोजन करण्याचा हेतू असल्याचे सांस्कतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

  • राज्यातील सर्व पुल व साकवांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

    राज्यातील सर्व पुल व साकवांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

    मुंबई: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील २५ वर्षापेक्षा जुने सर्व पूल, साकव तसेच इमारती यांचे सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने शासनास सादर करावा.

    तसेच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, वारी महामार्ग सुरक्षित राहील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिल्या.

    राज्यातील सर्व पूल व साकवांचा आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मंत्री भोसले बोलत होते. बैठकीस सचिव (बांधकाम) संजय दशपुते उपस्थित होते. तसेच राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

    यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याचा अदाज हवामान विभागाने दिला असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, पुल व साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जर एखादा पूल धोकादायक असेल तर त्या ठिकाणी वाहतूक बंद करुन पर्यायी मार्ग तातडीन उपलब्ध करून द्यावा. तसेच त्या ठिकाणी नवीन पूल, साकव उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. धोकादायक पुलाच्या ठिकाणी कायमस्वरुपी हवलता न येणारे बॅरिकेट्स लावावेत. स्थानिक पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत यांना धोकादायक पुलाविषयी माहिती कळवावी. पर्यायी रस्ता सुस्थितीत असेल याची काळजी घ्यावी. धोकादायक पुलावर ठळक अक्षरातील फलक लावण्यात यावेत. महामार्गावरील वापरात नसलेल्या पूलांच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून ते बंद करावेत. सार्वजनिक इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या. यापूर्वी पावसाळापूर्व विभागामार्फत करावयाची कामे या बाबात मे महिन्यात बैठक आयोजित करण्यात आली होती या मध्येही सर्व विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. या वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंत्यांसह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री भोसले म्हणाले की, सर्व रस्ते खड्डे मुक्त राहतील याची काळजी घ्यावी. तसेच वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. विशेषतः गणपती उत्सव काळात या मार्गावरून चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे गणपती उत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, वळण रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम पूर्ण करावे. विना अडथळा वाहतूक सुरू राहील, याची दक्षता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी. परशुराम घाटात पर्यायी पुलाचा प्रस्ताव सादर करावा. नियमाप्रमाणे सर्व वळण रस्ते तयार करावेत. वळण रस्ते पूर्ण झाल्यानंतरच मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करावी. घाट रस्त्यांवर जाळी बसवणे, ते सुस्थितीत ठेवणे तसेच दरड कोसळल्यास किंवा इतर अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी, अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.

    वारी महामार्गावर वारकऱ्यांसाठीच्या सोयी सुविधा उभाराव्यात. या मार्गावरील पुल, साकव यांचे कठडे दुरुस्त करावेत. तसेच या मार्गावरील पुलांचीही तपासणी करण्यात यावी. सुरक्षेच्या दृष्टीने वारी मार्गाची सर्व कामे करण्यात यावीत. वारीसाठी मार्ग पूर्ण सुरक्षित राहील याची दक्षता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. रस्त्यावरील खड्ड्यांविषयी विभागाने सुरू केलेल्या ॲपचा प्रभावी वापर करावा अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.

    ०००

    हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

  • सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे वृक्षारोपण संपन्न

    सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे वृक्षारोपण संपन्न

    रत्नागिरी: सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केले.

    शहरातील सावंत उद्यान येथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता.

    शाखेसाठी कदंब, रुई, अशोक, आपटा अशी विविध प्रकारची झाडे प्रदीप दिवेकर यांनी योगेश्वरी नर्सरीमधून मोफत उपलब्ध करून दिली.

    वृक्षारोपणाला शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी, उपाध्यक्ष सीए केदार करंबेळकर, सीए मंदार देवल, सामाजिक कार्यकर्ते समीर करमरकर, सोनल आंब्रे, महेश आंब्रे उपस्थित होते.

  • अहमदाबाद विमान दुर्घटना : १३५ मृतांचे डीएनए नमुने जुळवले; १०१ मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

    अहमदाबाद विमान दुर्घटना : १३५ मृतांचे डीएनए नमुने जुळवले; १०१ मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

    गुजरात: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील आतापर्यंत १३५ मृत व्यक्तींचे डीएनए नमुने जुळवण्यात यश आले असून, त्यापैकी १०१ मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

    ही माहिती मंगळवारी अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, १२ कुटुंबे लवकरच त्यांच्या नातेवाइकांचे पार्थिव स्वीकारणार असून, ५ कुटुंबांशी रुग्णालय प्रशासन सातत्याने संपर्कात आहे. तर १७ कुटुंबे इतर नातेवाईकांच्या डीएनए जुळवणीची प्रतीक्षा करत आहेत.

    डॉ. जोशी यांनी जिल्हानिहाय मृतदेहांच्या सुपूर्तीसंबंधी माहिती देताना सांगितले की, वडोदरा – १३, अहमदाबाद – ३०, आणंद – ९, भरूच – ४, गांधीनगर – ५, मेहसाणा – ५, खेड़ा – १०, सूरत – ३, अरावली – २, दीव – ४, बोटाद, जूनागढ, अमरेली, महीसागर, भावनगर, गिर सोमनाथ, नडियाद आणि राजकोट – प्रत्येकी १

    इतर राज्यांतील सुपूर्त मृतदेह : उदयपूर (राजस्थान) – २, जोधपूर – १, पाटणा (बिहार) – १, महाराष्ट्र – ४

    डॉ. जोशी यांनी सांगितले की, डीएनए नमुन्यांची जुळवणी ही अत्यंत संवेदनशील आणि कायदेशीर बाब असल्याने ही प्रक्रिया काळजीपूर्वक आणि गांभीर्याने पार पाडली जात आहे. मृतदेह लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्त करता यावेत, यासाठी फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, संबंधित संस्था, स्थानिक प्रशासन, राज्य सरकारच्या आरोग्य व इतर विभागांबरोबरच विविध यंत्रणा सक्रियपणे काम करत आहेत.

    ते पुढे म्हणाले की, डीएनए चाचणीच्या अहवालांची प्राप्ती होईल, तशी प्रक्रिया अधिक वेगाने पार पडेल. मृतदेह स्वीकारण्यासाठी आलेल्या नातेवाईकांसाठी आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सुविधा व व्यवस्था याचीही माहिती त्यांनी दिली.

  • रत्नागिरी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे थकीत कमिशन देण्याची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ

    रत्नागिरी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे थकीत कमिशन देण्याची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ

    मुंबई: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे मागील थकीत कमिशन अदा करण्याची कार्यवाही करावी. केंद्राचा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्याला द्यावयाचा हिस्सा तातडीने देवून कमीशन अदा करावे, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

    मंत्रालयात नागपूर व रत्नागिरी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत आयोजित बैठकीत मंत्री भुजबळ बोलत होते. बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रधान सचिव विनीता वेद सिंघल, रत्नागिरी जिल्हा बैठकीस आमदार शेखर निकम, नागपूर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बाबा आष्टणकर उपस्थित होते. रत्नागिरी बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे अध्यक्ष श्री. कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारशी संबंधित विषयांबाबत विभागाने सर्वंकष माहिती तयार करावी. यासंदर्भात लवकरच दिल्ली येथे केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येईल. रेशनकार्ड शोध मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेत अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांचे धान्य वितरण बंद झाल्यास धान्याचा कोटा वढविणे शक्य होईल. धान्य दुकानदारांना प्रति क्विंटल कमिशन वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी दिल्या.

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांना ओळखपत्र देण्यात यावे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना प्राधिकृत करावे. तसेच ऑफलाईन धान्य वितरणाची परवानगी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.

  • चिंचघरमध्ये मानवी वस्तीत घुसली मगर; वन विभाग, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!

    चिंचघरमध्ये मानवी वस्तीत घुसली मगर; वन विभाग, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!

    खेड: सद्यस्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. याचा परिणाम म्हणून वन्यजीव मानवी वस्तीत शिरल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना खेड तालुक्यातील चिंचघर येथील प्रभुवाडी येथे मंगळवारी रात्री घडली, जिथे थेट मानवी वस्तीत तब्बल चार फूट लांबीची एक मगर आढळून आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

    स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि वन विभागाच्या जलद प्रतिसादामुळे मात्र मोठा अनर्थ टळला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही मगर वस्तीत फिरताना दिसताच ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वन विभागाची बचाव पथक (रेस्क्यू टीम) क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाली.
    या बचाव मोहिमेत छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनचे सदस्य सूरज जाधव, सर्वेश पवार, श्वेत चोगले आणि रोहन खेडेकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे या मगरीला पकडले. रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम यशस्वीपणे पार पडली.
    पकडलेल्या मगरीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात, म्हणजेच नदी किंवा पाण्याच्या स्रोतामध्ये, सुरक्षितपणे सोडून देण्यात आले. या धाडसी आणि यशस्वी बचाव कार्यामुळे चिंचघरच्या ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. वन विभाग आणि छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनने दाखवलेल्या तत्परतेचे आणि त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि वन्यजीव दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • महामार्ग चौपदरीकरणातील चिखल-मातीने आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडांची दुर्दशा

    महामार्ग चौपदरीकरणातील चिखल-मातीने आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडांची दुर्दशा

    आरवली : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडांमध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील चिखल माती आल्यामुळे पार दुर्दशा झाली आहे. मागील काही दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे सोमवारी आरवली परिसरात पुराचे पाणी भरले होते. पुराच्या पाण्याबरोबर कुंडांच्या दोन्ही बाजूने गेलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मार्गीकांमधील चिखल-माती आली आहे.

    गडनदीच्या किनारी असलेली गरम पाण्याची कुंडे ही सखल भागात असल्यामुळे बाजूने गेलेल्या गड नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी कुंड परिसरात भरते. मात्र पूर ओसरल्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर कुंडामधील पाणी पुन्हा पूर्वीप्रमाणे होत असे. मात्र यावेळी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने निसर्गाची देणगी लाभलेल्या या कुंडांचा विचार न करताच महामार्गाचे काम केल्यामुळे याचा फटका आरवली येथील या गरम पाण्याच्या कुंडांना बसला आहे. सोमवारी आलेल्या पुरामुळे कुंडांच्या बाजूने गेलेल्या महामार्गाच्या कामामधील चिखल माती कुंडांमध्ये आली आहे. यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यात कधी नव्हे इतकी कुंडांची दुर्दशा झाली आहे.

  • दापोलीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

    दापोलीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

    दापोली : सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंकीदेवी धर्मेंद्रकुमार धामीन ( झारखंड, सध्या तालुका दापोली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पिंकीदेवीचे पती, दीर, सासू आणि सासरे अशा चार जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ नोव्हेंबर २०२३ ते १३ जून २०२५ दरम्यान घडली. 

    १६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.२८ वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.बिरेंद्र कमर जनार्दन पांडा (वय ३४, रा. बलिया पोस्ट पाथरा, थाना मजुरहान, पंचायत कुलम, जिल्हा छत्र, झारखंड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

    पिंकीदेवी भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, पिंकी हिला सासरचे लोक वारंवार शिवीगाळ करत होते, धमकी देत होते आणि पैशांची मागणी करून त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून आणि जगणे असह्य झाल्याने तिने गळफास लावून आत्महत्या केली. पिंकीदेवीच्या मृत्यूला तिचा पती धर्मेंद्रकुमार धामीन, दीर राजेशकुमार धामीन, सासू आणि सासरे रामदेव धामीन हे जबाबदार आहेत. आरोपी धर्मेंद्रकुमार आणि राजेशकुमार धामीन हे सध्या दापोली तालुक्यातील जळगाव येथे राहत आहेत.

    या प्रकरणी दापोली पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १०८, ८५, ११५(२), आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यापूर्वी दापोली पोलीस ठाण्यात १३ जून २०२५ रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.