आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातीलघट कायम आहे. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन १०.१७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.
तर सोयापेंडचे वायदे ३१७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात नरमाई आली आहे. बाजारात नव्या मालाची आवक सुरु झाल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ६७५ रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.
कापसात काहिशी सुधारणा
कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात आज भाव काहिसे वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कमी होऊन वायदे ७२.७५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५६ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
टोमॅटोच्या दरात चढ उतार
टोमॅटोची बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात चांगली वाढ झाली होती. मात्र वाढलेल्या भावात मागणीवर काहिसा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत. मात्र टोमॅटोचे वाढलेले सरासरी भाव कायम आहेत. आजही राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव दिसून आला. बाजारातील टोमॅटोचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी दिला.
हिंगोलीत सोयाबीन, मूग, उडदाला हमीभावापेक्षा कमी दर
हिरवी मिरची टिकून
राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव टिकून आहेत. बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहिशी वाढलेली दिसते. पण बाजारात मागणीही चांगली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे. बाजारात मिरचीचे भाव सध्या ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहिशी वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.
आल्याचा बाजार टिकून
आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.