सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू असून, गेले दोन-तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उभे भातपीक आडवे होण्यास सुरुवात झाली आहे. हळवी पिके हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कृषी विभागाने अजूनही नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केलेली नाही, मात्र शेकडो एकरवरील हळवी भातपिकांचे नुकसान होऊ लागल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी (ता.९) दिवसभर मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला झोडपून काढले. रात्रभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
परतीच्या पावसामुळे हळवी भातशेती धोक्यात
वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांत पावसाचा जोर अधिक आहे. वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने झोपून काढले आहे. सतत पावसाच्या सरी कोसळत आहेत. याशिवाय जिल्ह्यात उर्वरित भागाला देखील पावसाच्या सरी कोसळत आहेत.
गेले दोन-तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील भातपिकांचे
नुकसान होऊ लागले आहे. उभी पिके आडवी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ६२ हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड आहे. त्यातील ५ ते ६ हजार हेक्टर भातपिकाची पहिल्या टप्प्यात लागवड करण्यात आली होती. हे पीक महिनाभरापूर्वीच परिपक्व झालेले आहे. सततच्या पावसामुळे हे पीक आडवे होण्यास सुरुवात झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कृषी विभागाने सप्टेंबर अखेरीपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहे. परंतु सध्या पडत असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. असे असले तरी शेकडो एकर भातपिकांचे नुकसान झाले असण्याचा अंदाज आहे.