संगमेश्वर : तालुक्यातील मांजरे कोपरखरी येथील महावितरण कंपनीच्या नादुरुस्त रोहित्रातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीची तांब्याची गुंडाळी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी स्वप्नील दिलीप नाके हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या जाकादेवी शाखेत मुख्य तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मेढे, जाकादेवी ते उक्षी पर्यंतच्या विद्युत रोहित्रांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. मांजरे हद्दीतील कोपरखरी येथे महावितरण कंपनीचा २५ केव्हीए क्षमतेचा एक नादुरुस्त रोहित्र (क्रमांक डीटीसी ४१९००२६) बसवण्यात आला होता. २४ नोव्हेंबर २०२४ ते ४ मे २०२६ या कालावधीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने महावितरण विभागाची कोणतीही संमती नसताना लबाडीच्या इराद्याने या रोहित्रातील सुमारे ३५ किलो वजनाची तांब्याची गुंडाळी चोरून नेली. या चोरीची किंमत अंदाजे ३५ हजार रुपये इतकी असून ४ मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला.
त्यानंतर याप्रकरणी स्वप्नील नाके यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४/२०२६ अन्वये नोंद केला आहे. सरकारी मालमत्तेची अशा प्रकारे चोरी झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






