चिपळूण/प्रतिनिधी: महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गडकिल्ल्यांचे जतन करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सध्या एक विशेष आणि स्तुत्य मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत चिपळूण येथील ऐतिहासिक गोवळकोट परिसरातील गोविंद गडावर चिपळूण पोलीस ठाण्याच्या वतीने अत्यंत उत्साहात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनानुसार, चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) प्रकाश बेले तसेच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या थेट नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण फौजफाट्याने हातात झाडू घेऊन किल्ला परिसर चकाचक केला.
एरव्ही समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या हातात केवळ काठ्या आणि बंदुका पाहायला मिळतात, मात्र याच पोलीस दलाने रविवारी समाजसेवेचा एक नवा आदर्श घालत हातात झाडू आणि फावडे घेऊन ऐतिहासिक गोविंद गडाची स्वच्छता केली. या मोहिमेदरम्यान पोलिसांच्या विविध पथकांनी गडावरील ऐतिहासिक तोफांचा संपूर्ण परिसर, श्री रेडजाई देवी मंदिर परिसर, भक्कम बुरुज, तटबंदी आणि पर्यटकांसाठी असलेल्या पार्किंग एरियामधील साचलेला कचरा, प्लास्टिक व रानगवत पूर्णपणे काढून स्वच्छता केली. खाकी वर्दीतील या अनोख्या किल्ले रक्षकांच्या रूपाने गडाला एक वेगळेच चैतन्य लाभले होते.
किल्ला स्वच्छ करण्यासोबतच पोलीस प्रशासनाने गडाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. आपल्या पराक्रमाचा वारसा असलेल्या या गडकिल्ल्यांवर सर्वांनी स्वच्छता राखावी, ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण टाळावे आणि गडाच्या पवित्र्याला गालबोट लागेल असे कोणतेही गैरवर्तन अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे चिपळूणसह संपूर्ण जिल्ह्यातून आणि दुर्गप्रेमींकडून जोरदार कौतुक होत आहे.
