लांजा वेरळ येथील मुस्लिम बांधवांची पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना

Gramin Varta
484 Views

लांजा / फरहान पाटणकर: अर्धा जून महिना संपला तरी पाऊस न सुरू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना लांजा तालुक्यातील वेरळ येथील मुस्लिम समाज बांधवांनी पाऊस पडावा यासाठी रविवारी विशेष नमाज अदा करून अल्लाहकडे सामूहिक प्रार्थना केली.

शनिवार २० जून रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या विशेष नमाजमध्ये मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी लवकर पाऊस पडून शेतकरी, जनतेसह सर्व सजीवांचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना करण्यात आली.

सध्या तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र अपेक्षित पाऊस अद्याप न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. तसेच उष्णतेची तीव्रता वाढत असून पाण्याअभावी मानवासह पशुपक्ष्यांचे देखील हाल होत आहेत.

या पार्श्वभूमीवर अल्लाहकडे कृपावृष्टीची प्रार्थना करण्यासाठी वेरळ येथील मुस्लिम समाजाने धार्मिक परंपरेनुसार विशेष नमाज अदा करून पावसासाठी दुआ मागितली. या प्रसंगी उपस्थितांनी सामाजिक ऐक्य, शांतता आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठीही प्रार्थना केली.

Total Visitors :
4833760
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *