चिपळूण : पोफळी परिसरात एका ५९ वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिपक लक्ष्मण शिंदे असे या दुर्दैवी व्यक्तीचे नाव असून ते पोफळी येथील सरफारेवाडीचे रहिवासी होते. याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस) कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दिपक शिंदे कोणालाही कोणतीही पूर्वसूचना न देता घरून बाहेर पडले होते. मात्र, सायंकाळ होऊनही ते घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आणि वाडीतील ग्रामस्थांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पोफळी येथील पुलाजवळ असलेल्या जंगलात दिपक शिंदे यांचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिपक शिंदे यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणाने उचलले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या घटनेची रीतसर नोंद २० जून रोजी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
