फुणगूस येथील शास्त्री खाडीकिनाऱ्यावर शिलव्या काढण्यासाठी खवय्यांची झुंबड; परिसरात उत्साहाचे वातावरण

Gramin Varta
1193 Views

फुणगूस/ एजाज पटेल: फुणगूस येथील प्रसिद्ध शास्त्री खाडीकिनाऱ्यावर सध्या स्थानिक नागरिक आणि खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. खाडीच्या गाळात आणि पाण्यात नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या चविष्ट ‘शिलव्या’ काढण्यासाठी सध्या ग्रामस्थांची मोठी लगबग सुरू असून, यामुळे संपूर्ण खाडीकिनारा अक्षरशः फुलून गेला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मिळणाऱ्या या शिलव्यांचा आस्वाद घेण्यासाठी स्थानिक लोकांसह खवय्यांचीही मोठी झुंबड उडत आहे.

शास्त्री खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरीत्या शिलव्या सापडतात. भरती-ओहोटीच्या वेळा साधून गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने खाडीकिनाऱ्यावर दाखल होत आहेत. भरतीच्या वेळी पाण्यात आणि ओहोटीच्या वेळी उघड्या पडणाऱ्या चिखलातून अत्यंत मेहनतीने या शिलव्या शोधण्याचे काम सुरू असते. अनेक कुटुंबांसाठी हा केवळ खाद्यान्नाचा स्रोत नसून, रोजगाराचे एक साधनही बनले आहे. कोकणच्या किनारपट्टीवर शिलव्यांना मांसाहारी खवय्यांमध्ये मोठी मागणी असते. याची वैशिष्ट्यपूर्ण चव आणि रुचकर स्वरूपामुळे स्थानिक बाजारात त्यांना मोठी पसंती मिळते. उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला या ताज्या शिलव्या खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

सध्या शास्त्री खाडीच्या किनाऱ्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेकडो हात शिलव्या शोधण्यात मग्न असल्याचे दृश्य दिसत आहे. आबालवृद्धांची ही लगबग आणि खाडीकिनाऱ्यावरील गजबजाट यामुळे फुणगूसच्या शास्त्री खाडीकिनाऱ्याला सध्या एका वेगळ्याच उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या नैसर्गिक खाद्यासाठी केवळ स्थानिकच नव्हे, तर परिसरातील खवय्येही आवर्जून गर्दी करत असल्याने फुणगूस परिसरात सध्या मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4833827
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *