देवरुखमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Gramin Varta
304 Views

देवरुख: भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना २२ जून रोजी रात्री साडेसातच्या सुमारास देवरुख परिसरात घडली. या अपघातात ४९ वर्षीय इसम गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी दुचाकीस्वारावर देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी चंद्रकांत सखाराम बांडागळे (वय ४९, रा. मुरादपूर वरचीवाडी) हे आपल्या कामासाठी रस्त्यावरून पायी चालत जात होते. दरम्यान, साखरपा ते देवरुख मार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या अजिंक्य विलास जाधव (वय २५, रा. वांझोळे) याच्या मोटारसायकलने (एम.एच.०८/बी.एच.८५५८) बांडागळे यांना पाठीमागून जोराची धडक दिली. श्री. बाळा बेर्डे यांच्या घरासमोर घडलेल्या या अपघातात चंद्रकांत बांडागळे यांच्या उजव्या पायाला, डोक्याला आणि डाव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी अजिंक्य जाधव याने आपले वाहन हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी २२ जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *