पहिल्याच पावसात श्रीराम मंदिर परिसरातील ऐतिहासिक पिंपळ वृक्ष कोसळला

Gramin Varta
684 Views

शतकाहून अधिक काळ अनेक पिढ्यांचा साक्षीदार असलेला वृक्ष जमीनदोस्त; नागरिकांत हळहळ

लांजा : लांजा येथील श्रीराम मंदिर परिसरातील शतकाहून अधिक जुना पिंपळ वृक्ष आज सायंकाळी  अचानक कोसळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या माहितीनुसार, साधारणपणे १९२० पासूनची जाणती मंडळी हा वृक्ष पाहत आली आहेत. त्यामुळे हा वृक्ष त्याही आधीपासून अस्तित्वात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक पिढ्यांचा साक्षीदार ठरलेला हा पिंपळ वृक्ष लांजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग मानला जात होता.

नैसर्गिक ऑक्सिजनचा स्रोत, विविध पक्ष्यांचे निवासस्थान आणि नागरिकांना सावली देणारा हा विशाल वृक्ष कोसळल्याने मोठी हानी झाल्याची भावना बाजारपेठेतील व्यापारी मंदार भिंगार्डे यांनी व्यक्त केली. “कैक पिढ्या पाहिलेला आणि अनेकांच्या आठवणींशी जोडलेला हा वृक्ष आज कोसळल्याने लांजाने आपला एक ऐतिहासिक वारसा गमावला आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नगराध्यक्ष सावली कुरूप आणि उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) लांजेकर यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

पहिल्याच दमदार पावसात कोसळलेल्या या ऐतिहासिक पिंपळ वृक्षामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, लांजाच्या इतिहासातील एका जिवंत साक्षीदाराचा अंत झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4833922
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *