गुहागरच्या ‘गोल्डन मॅन’ विश्वास खरे खून प्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप

Gramin Varta
407 Views

गुहागर : येथील बहुचर्चित ‘गोल्डन मॅन’ आणि कासव संवर्धक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वास महादेव खरे यांच्या निर्घृण खून प्रकरणी तब्बल १२ वर्षांनंतर चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. बी. म्हाळतकर यांनी आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे (रा. बोपखेल, पुणे) आणि किरण रामदास कुचेकर (रा. उत्तमनगर, पुणे) या दोघांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३९४ सह ३४ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच, प्रत्येक आरोपीला एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षाही न्यायालयाने ठोठावली आहे.

१ ऑक्टोबर २०१४ रोजी गुहागर येथील ‘खरे प्लेझर पॉईंट’ या होमस्टेमध्ये चोरीच्या उद्देशाने आलेल्या या दोन पर्यटकांनी विश्वास खरे यांची विळा व सुऱ्याने २१ वार करून हत्या केली होती आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी लंपास केली होती. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. प्रफुल रामचंद्र साळवी यांनी प्रभावीपणे बाजू मांडून ५१ साक्षीदार तपासले, ज्यामध्ये मोबाईल टॉवर सीडीआर आणि आरोपींनी चोरीची साखळी विकल्याचे पुरावे निर्णायक ठरले. न्यायाधीश डी. बी. म्हाळतकर यांनी चिपळूण येथे नियुक्ती स्वीकारल्यानंतर १२ वर्षे प्रलंबित असलेला हा खटला अवघ्या १२ दिवसांच्या सलग सुनावणीतून निकाली काढून मृतकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *