रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा: ॲड. सागर कळंबटे राष्ट्रीय कबड्डी पंच

Gramin Varta
153 Views

रत्नागिरी: राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत रत्नागिरीचे सुपुत्र ॲड. सागर शिवाजी कळंबटे यांनी विशेष प्राविण्य मिळवत यश संपादन केले आहे. मिरजोळे येथील लक्ष्मीकांतवाडीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या सागर कळंबटे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर झेप घेत रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

क्रीडा क्षेत्रातील प्रवासाबद्दल बोलायचे तर, सागर यांनी कालिका कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कबड्डीच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मंडळाच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर, २०१९ मध्ये त्यांनी पहिली जिल्हास्तरीय पंच परीक्षा उत्तीर्ण केली. जिल्हा पंच म्हणून यशस्वी कामगिरी केल्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी राज्यस्तरीय पंच परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यानंतर सातत्याने सात वर्षे तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पार पडलेल्या विविध कबड्डी स्पर्धा व चाचणी स्पर्धांमध्ये त्यांनी पंचांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे.

२०२६ च्या राष्ट्रीय पंच परीक्षेत यश मिळवल्यामुळे आता ॲड. सागर कळंबटे राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांमध्ये पंच म्हणून आपली सेवा बजावणार आहेत. या यशाबद्दल बोलताना ॲड. सागर यांनी सांगितले की, देशासाठी पंच म्हणून जबाबदारी पार पाडणे ही अभिमानाची गोष्ट आहे. यापुढे मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन कोकणचे नाव देशभर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक स्तरावर काम करण्याचे माझे ध्येय आहे. ॲड. सागर कळंबटे यांच्या या उत्तुंग यशामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, रत्नागिरीच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *