रत्नागिरी: रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कलाविश्वात डिजिटल क्रांती घडवून आणणाऱ्या ‘काय समजलीव’ या संस्थेच्या वतीने आयोजित ‘कोण होणार कोकणचा रिलबाज’ ही स्पर्धा यंदाही अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाली. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित या स्पर्धेने कोकणातील उदयोन्मुख क्रिएटर्सना एक हक्काचा आणि भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

‘नमन कोकणची लोककला’ या विषयावर आधारित या स्पर्धेत सहभागी झालेल्या तब्बल १४८ स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेचा आणि तांत्रिक कौशल्याचा कस लावत कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन डिजिटल रील्सच्या माध्यमातून घडवून आणले.

आयोजक प्रणय पाटील आणि त्यांच्या ‘काय समजलीव’ टीमने अत्यंत कल्पकतेने या स्पर्धेचे नियोजन केले होते. स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या रील्सचा दर्जा पाहून उपस्थितांनी उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनुभवी प्रदीप शिवगण आणि जाधव सर यांनी काम पाहिले असून, त्यांनी निकोप स्पर्धेतून सर्वोत्तम कलाकृतींची निवड केली. या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून श्रेयस माईन, सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून साहिल चरकारी, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून प्रथमेश पवार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून साक्षी बने आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून साईप्रसाद विलणकर (vo_azad_parinda) यांना गौरविण्यात आले.

मुख्य स्पर्धेमध्ये ‘झो मंडळी’ या टीमने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला, तर सुमित मालप (vo_azad_parinda) याने द्वितीय आणि सौरभ बने याने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिके प्रथमेश पवार आणि रिध्देश मांडवे यांनी मिळविली, तर प्रेक्षकांच्या पसंतीचा ‘बेस्ट रील’चा बहुमान नविल भोळे याने आपल्या नावे केला.

या दिमाखदार बक्षीस वितरण सोहळ्याला रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेविका मेधा कुलकर्णी, नमन लोककला मंडळाचे पी.टी. कांबळे, अकील नाईक आणि परेश साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करतानाच, कोकणची लोककला डिजिटल माध्यमाद्वारे नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. ‘काय समजलीव’ या उपक्रमामुळे कोकणातील तरुण कलाकारांना आपली प्रतिभा जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक नवी प्रेरणा मिळाली आहे.


