लोकमान्य, न्यू एज्युकेशन सोसायटी व माजी विद्यार्थी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने लांजात सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शन
लांजा/फरहान पाटणकर: डिजिटल व्यवहारांचे वाढते प्रमाण आणि त्याचबरोबर वाढणारे सायबर गुन्हे लक्षात घेता प्रत्येक नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहणे गरजेचे असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना जबाबदारी, सतर्कता आणि गुन्ह्यांपासून बचावासाठी डिजिटल साक्षरता ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.अक्षय फाटक यांनी केले.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी, न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजा, श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी असोसिएशन, लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राईम आणि सायबर सुरक्षा या महत्त्वपूर्ण विषयावरील व्याख्यानाचे आयोजन श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयात मंगळवार ३० जून रोजी सकाळी करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी ज्योतिषशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त तसेच मायक्रोसॉफ्ट आणि लिनक्स इंजिनिअर डॉ.अक्षय फाटक हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
फाटक यांनी पुढे बोलताना, विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, ऑनलाईन फसवणुकीचे विविध प्रकार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, मोबाईल व बँकिंग व्यवहारांतील खबरदारी, मजबूत पासवर्डची गरज, ओटीपी, केवायसी, फिशिंग लिंक, बनावट कॉल आणि डिजिटल फ्रॉडपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत उदाहरणांसह सविस्तर मार्गदर्शन केले. इंटरनेटचा वापर करताना विवेक, सतर्कता आणि माहितीची पडताळणी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांनी केवळ पदवी शिक्षणावर न थांबता तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करावेत, डिजिटल जगातील संधींसह त्यातील धोकेही समजून घ्यावेत असे आवाहन केले. सायबर सुरक्षेबाबतची जागरूकता ही आजच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग बनली असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार डिजिटल नागरिकत्वाची जाणीव निर्माण होते. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा ज्ञानवर्धक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल असे डॉ.अक्षय फाटक यांनी स्पष्ट केले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य सौ.सुवर्णा पाटील-देऊसकर, माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम साळवी, महेश सप्रे, लोकमान्यचे रत्नागिरी विभागाचे असिस्टंट रिजनल मॅनेजर वीरेंद्र ठाकूर, लांजा शाखा व्यवस्थापक ओमकार शिंदे, शाखा व्यवस्थापक आशिष रेऊरकर, मार्केटिंग असिस्टंट कुणाल जोशी, सीएसआर असिस्टंट अभिषेक कात्रे यांच्यासह लोकमान्यचे अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य सुवर्णा पाटील-देऊसकर यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना विजय हटकर यांनी केली, तर न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेसंदर्भातील विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले
सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी डिजिटल साक्षरता काळाची गरज – डॉ.अक्षय फाटक
Leave a Comment
