परशुराम घाटात ‘व्हॅया डक्ट’ पूल उभारण्याच्या हालचाली; आराखडा तयार करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती

Gramin Varta
173 Views

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील गॅबियन वॉलचा भराव वारंवार खचत असल्याने, प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी आता या ठिकाणी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा-खंडाळा घाटाच्या धर्तीवर ‘व्हॅया डक्ट’ पूल उभारण्यावर विचार केला जात आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने पावले उचलली असून, पुलाचा आराखडा तयार करण्यासाठी ‘थॉट कन्सल्टन्सी’ या एजन्सीची नियुक्ती केली आहे. ही एजन्सी आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे सादर करणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

परशुराम घाटात सुरक्षेच्या दृष्टीने उभारलेली गॅबियन वॉल गेल्या काही काळापासून मोठी डोकेदुखी ठरली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी ही कामे घाईघाईत पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पहिल्याच पावसात भराव वाहून गेल्याने संरक्षक भिंत खचली होती. त्यानंतर नव्याने केलेले काँक्रीटीकरणही खचल्याने घाटातील कामे थांबवण्यात आली होती. सद्यस्थितीत घाटात तात्पुरती उपाययोजना म्हणून प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पेण येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅबियन वॉलच्या मूळ बांधकामाला कोणताही धोका नसून केवळ मातीचा भराव वाहून गेला आहे, तरीही सुरक्षेसाठी घाटातील दुहेरी वाहतूक अद्यापही सुरूच ठेवण्यात आली आहे. आता ‘व्हॅया डक्ट’ पुलाच्या प्रस्तावित आराखड्यामुळे या भागातील प्रवासाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *