चिपळूण येथील व्यावसायिकाची १० लाखांची फसवणूक; बनावट फ्रँचायसीच्या नावाखाली गंडा

Gramin Varta
304 Views

चिपळूण : येथील एका तरुण व्यावसायिकाला नामांकित डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १० लाख २० हजार १७४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौस्तुभ अविनाश अभ्यंकर (वय २८, रा. खेर्डी बाजारपेठ) असे फिर्यादीचे नाव आहे. कौस्तुभ हे खेर्डी येथे स्पेअर पार्टचे दुकान चालवतात. त्यांना व्यवसायानिमित्त डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायसी हवी होती. यादरम्यान अभय महाजन आणि प्रियांका सिंग या दोन व्यक्तींनी फिर्यादीशी ऑनलाईन संपर्क साधला. त्यांनी डिलिव्हरी कंपनीच्या फ्रँचायसीबाबत खोटी माहिती देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फ्रँचायसी मिळवून देण्याच्या नावाखाली वेळोवेळी फिर्यादीच्या खात्यातून आरोपींनी दिलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या खात्यावर १० लाख २० हजार १७४ रुपये ट्रान्सफर करून घेतले. पैसे जमा झाल्यानंतरही आरोपींनी ना त्यांना फ्रँचायसी दिली, ना पैसे परत केले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कौस्तुभ अभ्यंकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) नुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *