चिपळूणमध्ये वन विभागाची मोठी कामगिरी; जीवाची बाजी लावून पडीक विहिरीतील दोन अवाढव्य मगरींना दिले जीवदान

Gramin Varta
273 Views

चिपळूण: तालुक्यातील मौजे मालघर येथील टेपवाडी भागात एका पडीक विहिरीत पडलेल्या दोन अवाढव्य मगरींना सुरक्षितपणे बाहेर काढून वन विभागाच्या बचाव पथकाने जीवदान दिले आहे. वनरक्षक राहुल गुंठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून अत्यंत जोखमीचे हे बचाव कार्य यशस्वीरित्या पार पाडले. ही थरारक घटना १६ जून २०२६ रोजी उघडकीस आली असून, वन कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

मालघर गावच्या धरणाला लागूनच एक पाणी नसलेली सुमारे १० फूट खोल पडीक विहीर आहे. धरणातून बाहेर पडलेल्या दोन मगरी अचानक या विहिरीत कोसळल्याचे स्थानिक ग्रामस्थ प्रकाश लटके यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने रामपूरचे वनरक्षक राहुल गुंठे यांना दिली. माहिती मिळताच चिपळूण वन परिमंडळातील बचाव कार्य पथक सर्व साधनांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पाणी नसल्याने मगरी तिथेच अडकून पडल्या होत्या. वन विभागाच्या बचाव पथकाने विहिरीत शिडी सोडून खाली उतरत मगरींची पाहणी केली असता, त्यातील एक मगर तब्बल ९ फुटांची तर दुसरी ७ फुटांची असल्याचे स्पष्ट झाले. विहिरीची खोली आणि मगरींचा अवाढव्य आकार पाहता हे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक आणि धोक्याचे होते. मात्र, वन कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिताफीने व धाडसाने ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मगरींना एक-एक करून विहिरीबाहेर काढले.

विहिरीबाहेर काढल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी दोन्ही मगरींची वैद्यकीय तपासणी केली असता त्या पूर्णपणे सुस्थितीत व सुरक्षित असल्याची खात्री पटली. त्यानंतर वरिष्ठांकडून आवश्यक ते आदेश घेऊन दोन्ही मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. हे संपूर्ण यशस्वी बचाव कार्य विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वन संरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि चिपळूणचे वन परिक्षेत्र अधिकारी जितेंद्र गुजले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत चिपळूणचे वनपाल एस. एस. सावंत, रामपूरचे वनरक्षक राहुल गुंठे, कोळकेवाडीचे वनरक्षक कृष्णा इरमले, फिरत्या पथकाचे वनरक्षक दत्ताराम सुर्वे, तसेच वाहन चालक अजय बडदे व नंदकुमार कदम यांनी थेट सहभाग घेतला. तसेच माहिती देणारे प्रकाश लटके आणि इतर स्थानिक ग्रामस्थांनी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोलाचे सहकार्य केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *