मंडणगड : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता घाटमार्गांनाही बसू लागला आहे. मंडणगड तालुक्यातील तुळशी घाटात आज, ५ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने घाटमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरड थेट रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद करण्यात आली असून, दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम हाती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे.
सध्या मंडणगड तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याने डोंगरकड्यांमधून माती व दगड घसरून दरडी कोसळण्याच्या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे घाटमार्गातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरड पूर्णपणे हटविल्यानंतर आणि रस्त्याची सुरक्षितता तपासल्यानंतरच वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मंडणगड : तुळशी घाटात दरड कोसळली, दोन्ही बाजूंची वाहतूक बंद, वाहनचालकांना सावधगिरीचे आवाहन
Leave a Comment
