दाभोळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गरोदर केल्याप्रकरणी नराधमावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

Gramin Varta
722 Views

दापोली : तालुक्यातील दाभोळ परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ५ महिन्यांची गरोदर केल्याप्रकरणी ४० वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश कृष्णा फणसकर (रा. ढोरसई, दाभोळ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी राकेश याने पीडित मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत गेल्या वर्षभरापासून तिला जंगलात नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडित मुलीच्या प्रकृतीत बदल जाणवू लागल्याने तिला उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, ती ५ महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. हा प्रकार उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पीडितेच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात सुरुवातीला शून्य क्रमांकाने गुन्हा नोंद करण्यात आला होता, त्यानंतर पुढील तपासासाठी सर्व कागदपत्रे दाभोळ सागरी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

दाभोळ सागरी पोलिसांनी आरोपी राकेश फणसकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६४(१), ६४(२)(M) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ६ आणि ८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांनी स्वतः तपास हाती घेतला असून, या घटनेची माहिती प्रथमवर्ग न्यायालय, दापोली येथे देण्यात आली आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यासह संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *