दापोली : जुन्या नाण्यांच्या खरेदी-विक्रीतून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवत दापोली तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १६ लाख ८० हजार २५० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन संशयितांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल जानराव राणे (वय ५९, रा. पांगारवाडी, ता. दापोली) यांनी याबाबत दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तक्रारीनुसार, १५ मार्च २०२६ ते २१ मे २०२६ या कालावधीत साहिल कुमार आणि विशाल सिंह (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) या संशयितांनी मोबाईलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला होता.
जुन्या नाण्यांच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन देत संशयितांनी विविध प्रक्रिया शुल्क, कमिशन आणि अन्य कारणांसाठी वेळोवेळी ऑनलाइन पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादींनी एकूण १६ लाख ८० हजार २५० रुपये संबंधितांच्या खात्यावर ऑनलाइन पाठविले. मात्र, आश्वासनाप्रमाणे कोणताही आर्थिक लाभ अथवा रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर राणे यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(२), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
