मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) या दोन स्वतंत्र यंत्रणांकडून समांतर सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अपघाताचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी होत असली, तरी AAIBचा अंतिम अहवाल येण्यापूर्वी सीबीआयला त्यात हस्तक्षेप करता येत नाही, अशी भूमिका केंद्रीय यंत्रणेने घेतल्याचे फडणवीसांनी सांगितले.
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. सीआयडीने आतापर्यंत केलेल्या सखोल तपासात पायलट सुमित कपूर यांची बँक खाती, आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीची कसून पडताळणी करण्यात आली आहे. यासोबतच सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांचेही विश्लेषण पूर्ण झाले असून, या तपासात अद्याप कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. या प्रकरणातील तांत्रिक तपास हा अत्यंत महत्त्वाचा असून अपघातग्रस्त विमानातील उपकरणांमधून डेटा यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आला आहे, ज्याचे सध्या विश्लेषण सुरू आहे. या तांत्रिक अहवालातूनच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनुसार, जानेवारी महिन्यापूर्वी AAIBचा अंतिम अहवाल सादर होण्याची दाट शक्यता आहे. या तपास प्रक्रियेत अमेरिकेतील तज्ज्ञ संस्थेचीही मदत घेण्यात आली असल्याने, अजित पवार यांच्या पुण्यतिथीपूर्वी हा अहवाल प्राप्त होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सरकारचे या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष असून, तपासात कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
