फलटण-पुसेगाव मार्गावर दरडीचा थरार; कारवर दगड कोसळून बारामतीतील तरुणाचा दुर्दैवी अंत

Gramin Varta
142 Views

सातारा: जिल्ह्यात कोसळणाऱ्या संततधार पावसाचा फटका आता घाटरस्त्यांनाही बसू लागला असून, फलटण-पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात रविवारी दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात बारामती येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पोपट जगताप (रा. बारामती) हे आपल्या चारचाकी वाहनातून ताथवडे घाटातून प्रवास करत असताना अचानक डोंगरावरून मोठे दगड कोसळले. त्यापैकी एक मोठा दगड थेट चालकाच्या कारवर आदळल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या खांबावर जोरदार जाऊन धडकली. या अपघाताचा आघात इतका तीव्र होता की, योगेश जगताप यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहनात अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून घाटरस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले असल्याने, प्रशासनाने वाहनचालकांना ताथवडे घाटासह सर्व घाटरस्त्यांवरून प्रवास करताना विशेष दक्षता घेण्याचे आणि अतिवृष्टीच्या काळात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. या अपघाताचा अधिक तपास महिला पोलीस जाधव करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *