ठाण्यात पावसाचा कहर: चाळीची गॅलरी कोसळून १० वर्षीय मुलाचा मृत्यू, दोघांची प्रकृती स्थिर

Gramin Varta
119 Views

ठाणे : आझाद नगर परिसरात आज मुसळधार पावसामुळे हृदयद्रावक दुर्घटना घडली असून, मद्रास चाळीची पहिल्या मजल्यावरील गॅलरी अचानक कोसळल्याने १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक महिला आणि एक लहान मूल जखमी झाले असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आझाद नगर येथील सुमारे २५ ते ३० वर्षे जुन्या मद्रास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत जयकुमार जयस्वाल हा १० वर्षीय मुलगा ढिगाऱ्याखाली अडकला. त्याला तातडीने बाहेर काढून सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत उर्मिला जयस्वाल (वय ३०) आणि विनीतकुमार जयस्वाल (वय ८) हे जखमी झाले असून, स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, प्रभाग समितीचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून इमारतीच्या उर्वरित भागाची सुरक्षितता तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, सततच्या मुसळधार पावसामुळे इमारतीचा हा भाग कमकुवत होऊन कोसळला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या दुर्घटनेनंतर परिसरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या तपासणीची मागणी स्थानिकांनी केली आहे.

दुसरीकडे, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या आठवड्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे ८०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये एकूण ११ जण जखमी झाले आहेत. बुधवारी मुरबाड तालुक्यात वीज पडून एका किशोरवयीन मुलीसह दोन जण जखमी झाल्याचीही घटना घडली असून, त्यांच्यावर टोकावडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पावसाळी दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *