शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २१ वे मरणोत्तर देहदान संपन्न; नाचणे येथील मंगल जोगळेकर यांनी जपला मानवतेचा वारसा

Gramin Varta
360 Views

रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरीतील नाचणे येथील रहिवासी कै. श्रीमती मंगल भालचंद्र जोगळेकर (वय ५९) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २१ वे मरणोत्तर देहदान संपन्न झाले. अल्पशा आजाराने १३ जुलै २०२६ रोजी शासकीय रुग्णालयात त्यांचे निधन झाले. श्रीमती जोगळेकर यांनी फेब्रुवारी २०२५ मध्येच या महाविद्यालयात देहदान करण्याचा संकल्प केला होता, त्यानुसार त्यांच्या इच्छेचा आदर करत कुटुंबियांनी हे पुण्याचे काम पूर्ण केले.

श्रीमती जोगळेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या सौ. प्राची सावंत आणि जावई श्री. प्रदीप सावंत यांच्यासह नातेवाईकांनी तत्परता दाखवत देहदानाची प्रक्रिया पार पाडली. या महत्त्वपूर्ण कार्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे आणि समाजसेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी, श्रीपाद गांधी आणि रुग्णवाहिका चालक प्रीतम भोसले यांनी सहकार्य केले. या प्रक्रियेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर तसेच अतिदक्षता विभागातील परिचारिका श्रीमती प्राजक्ता कोरगांवकर व श्री. सौरभ चित्ते यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. समाजात देहदानाबद्दलची जागरूकता वाढवणारी ही घटना ठळकपणे समोर आली असून, जोगळेकर कुटुंबाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitors :
4820662
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *