देवरुख: राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, महाराष्ट्रच्या (रत्नागिरी विभाग) प्रादेशिक सचिवपदी फेरनिवड झाल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष तथा सचिव विजयराव भाऊराव शिंदे यांचा देवरुख येथील नृसिंह मंगल कार्यालयात आयोजित विशेष सोहळ्यात सत्कार करण्यात आला. १५ जुलै रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात संघटनेच्या पदाधिकारी आणि सभासदांनी त्यांचा गौरव केला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. यावेळी सचिव प्रकाश जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दिवंगत सभासदांना याप्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, वाढदिवस असलेल्या सभासदांचा गुलाबपुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर अनिल रहाटे, विजय निंबाळकर, पांडुरंग फाटक, संजय वेल्हाळ, श्रद्धानंद सावंत, काशिनाथ अणेराव आणि सुधीर गानू उपस्थित होते.
प्रादेशिक सचिवपदी पुनर्नियुक्त झालेल्या विजयराव शिंदे यांना सन्मानपत्र, भेटवस्तू, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. शिंदे यांच्या बहुआयामी कार्याचा सन्मानपत्रात विशेष उल्लेख करण्यात आला असून, त्यांना एक उत्कृष्ट कबड्डीपटू, क्रीडा पंच आणि खंबीर संघटक म्हणून ओळखले जाते. सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील त्यांच्या दांडग्या अनुभवासाठी त्यांना राज्यपाल सन्मानित गुणवंत पुरस्कारासह ५४ पेक्षा अधिक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने अनिल रहाटे, विजय निंबाळकर, काशिनाथ अणेराव, श्रद्धानंद सावंत, पांडुरंग फाटक, माने आणि अजित सावंत यांनी आपल्या मनोगतातून विजयराव शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाची माहिती राज्य प्रसिद्धी सचिव रत्नपाल जाधव यांनी दिली.
