लांजा: शिक्षणाच्या घोषणांच्या गप्पा आणि चिमुकल्यांचे उघड्यावर शिक्षण; पालटोक धनगरवाडी शाळा प्रकरणावरून प्रशासनाला घरचा आहेर

Gramin Varta
191 Views

लांजा/ अंकुश पोटले: शासनाकडून शिक्षणाच्या बाबतीत मोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष ग्रामीण भागात मात्र परिस्थिती विदारक असल्याचे समोर आले आहे. लांजा तालुक्यातील कोंडगे गावातील पालटोक धनगरवाडी येथील जिल्हा परिषद शाळा मंजूर होऊन पाच ते सहा वर्षे उलटली असूनही अद्याप शाळा इमारत उभी राहिलेली नाही. कंत्राटदाराने शाळेची जुनी इमारत पाडून खोदकाम अर्धवट सोडून पलायन केल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांवर आजही लोकांच्या दारी उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला जाब विचारला आहे.

पालटोक धनगरवाडी जिल्हा परिषद शाळा क्र. ५ ची मंजूर झालेली इमारत उभी न राहिल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. सचिन बेर्डे यांनी प्रत्यक्ष शाळा स्थळाला भेट दिली असता, विद्यार्थी घराच्या अंगणात उघड्यावर शिक्षण घेत असल्याचे भयावह चित्र त्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत, मंजूर शाळेचे नेमके काय झाले, खोदकामानंतर शाळा का उभारली गेली नाही, तसेच या शाळेसाठी मंजूर झालेला निधी कुठे गेला, अशा प्रश्नांचा भडिमार केला आहे.

या प्रकरणी सचिन बेर्डे यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांशी (बीडीओ) दूरध्वनीवरून चर्चा केली असून, तातडीने चौकशीची मागणी केली आहे. प्रशासनाने चौकशीसाठी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले असले, तरी केवळ आश्वासने नकोत, तर स्पष्टीकरण हवे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. राजकारणापेक्षा विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करत, जर प्रशासनाने यावर योग्य खुलासा न केल्यास येत्या १५ ऑगस्टला जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शाळा मिळवून देऊ, असा ठाम निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. केवळ भाषणांत शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाला प्रत्यक्ष शाळेची दुरवस्था का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी शासनाच्या धोरणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4820690
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *