चिपळुणातील पाग पॉवर हाऊस–चिंचनाका मार्गाचे रुंदीकरण व दुपदरीकरण नोव्हेंबरपासून; नगराध्यक्षांची ग्वाही

Gramin Varta
58 Views

गुहागर बायपास रोडवरील धोकादायक उतारावर उपाययोजनांची मागणी

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून चिपळूण शहराला जोडणाऱ्या गुहागर बायपास रोड तसेच मध्यवर्ती एसटी बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर महामार्गावरून उतरताना असलेल्या तीव्र उतारामुळे वारंवार अपघात होत असल्याने या ठिकाणी गतिरोधकांसह आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी चिपळूण नगर पालिकेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याकडे केली.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नगरपालिकेत नगराध्यक्षांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी या मार्गावरील धोकादायक स्थिती, वारंवार होणारे अपघात आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

यावर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पाग पॉवर हाऊस ते चिंचनाका या रस्त्याचे मध्यभागी दुभाजक (डिव्हायडर) उभारून दुपदरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कामाला नोव्हेंबर महिन्यात प्रारंभ होणार असून, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरून उतरताना निर्माण होणारी धोकादायक परिस्थिती मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय दैनिक सागरचे संस्थापक संपादक निशिकांत तथा नाना जोशी यांचे नाव या रस्त्याला दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच, गुहागर बायपास रोड येथे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि नगर पालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या तातडीच्या सुरक्षा उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी शिष्टमंडळाला दिली.

या वेळी माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, जलदूत शहानवाज शहा, श्वेता ओतारी, समीर कोवळे, कैसर देसाई यांनी नागरिकांच्या वतीने विविध सूचना मांडल्या. बैठकीला बांधकाम सभापती कपिल शिर्के, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, नगरसेवक उदय जुवळे, विकी लवेकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या मार्गावरील अपघात टाळण्यासाठी तातडीच्या सुरक्षा उपाययोजना आणि दीर्घकालीन स्वरूपात रस्त्याच्या दुपदरीकरणाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *