चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनी व प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. बहादूरशेख ते प्रांत कार्यालय या सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील हा उड्डाणपूल रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प असून, याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाचे उर्वरित १० टक्के काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र काम सुरू असून, प्रांत कार्यालयाकडील काही गर्डर आणि मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या जोड रस्त्याचे काम शिल्लक राहिले आहे.
१८०० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदी असलेल्या या उड्डाणपुलावर ९५ पिलर उभारण्यात आले असून, हा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक लांबीचा पूल ठरणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांना या पुलाचा मोठा फायदा होणार असून, वेळेत काम पूर्ण झाल्यास गणेशभक्तांचा प्रवास सुकर होणार आहे.
