अडरेचे सुपुत्र सचिन कदम यांची मुंबई एटीएसच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती; कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिसरात कौतुक

Gramin Varta
98 Views

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील अडरे गावचे सुपुत्र आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सचिन मुरारी कदम यांची मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अडरे गावासह संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सन १९९५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू झालेल्या सचिन कदम यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यातून आपल्या प्रवासाची सुरुवात केल्यानंतर गुन्हे शाखेत असताना त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावून कुख्यात गुन्हेगारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. विशेषतः २००३ मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. २००४ ते २०१३ या काळात दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असताना त्यांनी सुमारे ५० दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळवले. २००६ चे मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट आणि २०११ मधील झवेरी बाजार, दादर व ऑपेरा हाऊस बॉम्बस्फोट प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. बनावट नोटा, अंमली पदार्थ आणि अवैध शस्त्रसाठा जप्त करून अनेक गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश करणाऱ्या कदम यांना २०११ मध्ये पोलीस महासंचालक पदक, २०१९ मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक आणि केंद्रीय गृहमंत्री पदक अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आजवर त्यांना एक हजारांहून अधिक प्रशस्तीपत्रे मिळाली असून, त्यांच्या निष्ठावान सेवेला मिळालेली ही नवीन नियुक्ती अडरे गावासाठी अभिमानास्पद ठरली आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाने गावातील तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *