ग्रामीण वार्ताच्या बातमीने खळबळ : चिपळुणातील समाज कल्याण विभागातील ठेकेदार कंपनीच्या जिल्हा सुपरवायझरचा राजीनामा

Gramin Varta
111 Views

प्रकृतीचे कारण की ‘वरिष्ठांना’ वाचवण्याचा प्रयत्न?

रत्नागिरी: चिपळूण-खेर्डी येथील शासकीय वसतिगृहातील सफाई घोटाळ्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, संबंधित खाजगी ठेकेदार कंपनीच्या जिल्हा सुपरवायझरने तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या तडकाफडकी निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यात आता एकाच चर्चेला उधाण आले आहे.

या राजीनामा पत्रामध्ये संबंधित सुपरवायझरने प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण पुढे केले आहे. मात्र, वसतिगृहातील लाखो रुपयांच्या कथित सफाई घोटाळ्याचे वृत्त माध्यमांमध्ये गाजल्यानंतर लगेचच हा राजीनामा पुढे आल्याने यामागे मोठे राजकीय व प्रशासकीय नाट्य असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांची ओळख चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे या घोटाळ्यात आपण स्वतः अडकू नये आणि मूळ सूत्रधार सुरक्षित राहावेत, यासाठीच समाज कल्याण विभागातील संबंधित बड्या अधिकाऱ्यांनी दबाव आणून या जिल्हा सुपरवायझरला तडकाफडकी राजीनामा देण्यास भाग पाडले नाही ना, असा संशय आता अधिक बळावला आहे.

वसतिगृहात विद्यार्थी नसताना आणि सुरक्षा रक्षक साफसफाई करत असताना, कागदोपत्री खोट्या स्वाक्षऱ्या करून चार वर्षे बिले लाटल्याचे उघड झाले होते. या घोटाळ्यात स्थानिक पातळीवर व्यवस्थापन पाहणाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची भूमिका आधीच संशयास्पद मानली जात होती. त्यातच आता जिल्हा प्रमुखाचा राजीनामा म्हणजे चौकशीची आच वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचू नये म्हणून केलेला ‘बळीचा बकरा’ असल्याचा संशय आहे. या राजीनाम्यामुळे या सफाई घोटाळ्याचे गूढ आणि त्यातील अधिकाऱ्यांचे कनेक्शन अधिकच गडद झाले आहे.

प्रकृतीचे कारण की ‘वरिष्ठांना’ वाचवण्याचा प्रयत्न?

घोटाळा चव्हाट्यावर येताच जिल्हा सुपरवायझरने दिलेला राजीनामा म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी खेळलेली खेळी असल्याची जोरदार चर्चा आहे. सुपरवायझर हा अधिकाऱ्यांची खरी ओळख उघडी करू शकत असल्यामुळेच त्याला बाजूला सारण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे केवळ राजीनामा स्वीकारून फाईल बंद न करता, या संपूर्ण प्रकरणाची फौजदारी चौकशी करून मूळ गुन्हेगार अधिकाऱ्यांना हुडकून काढावे, अशी मागणी रत्नागिरीकरांमधून होत आहे.

‘बळीचा बकरा’ की मोठे कनेक्शन?

कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करणाऱ्या या सफाई घोटाळ्यात जिल्हा सुपरवायझर बळीचा बकरा बनवण्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात वसतिगृहात न गेलेले अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील केवळ एक दुवा होते. चौकशीची सुई आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून समाज कल्याणच्या ‘बड्या’ माशांनीच स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हा राजीनामा नाट्य घडवून आणल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधारांचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *