लोटे एमआयडीसीचा पाणीपुरवठा १३ दिवसांनंतर पूर्ववत; उद्योगांना मोठा दिलासा

Gramin Varta
15 Views

चिपळूण: तब्बल १३ दिवसांपासून बंद असलेला लोटे एमआयडीसीचा पाणीपुरवठा अखेर शनिवारी पुन्हा सुरू झाला असून, औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. कोयना धरणातून वीज निर्मितीसाठी पाणी सोडणे बंद झाल्यामुळे १४ जूनपासून वाशिष्ठी नदीतील पाण्याची पातळी खालावली होती, ज्यामुळे वालोपे येथील उपसा केंद्रातील पंप बंद पडले होते. या प्रदीर्घ खंडामुळे उद्योगांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन आर्थिक नुकसान सोसावे लागले होते, तसेच परिसरातील ग्रामस्थांचीही मोठी गैरसोय झाली होती.

दरम्यान, अलीकडे झालेल्या पावसामुळे नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आणि पाण्याची गुणवत्ताही समाधानकारक आढळल्याने उद्योजकांच्या मागणीनुसार प्रशासनाने शनिवारी दुपारी पंप कार्यान्वित केले. सध्या जलशुद्धीकरण प्रक्रियेनंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार असून, रविवारी झालेल्या पावसामुळे नदीतील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने आगामी काळात परिस्थिती अधिक सुधारण्याची आशा व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *