भोंदू खरातवर ईडीचे ३ हजार पानांचे आरोपपत्र

Gramin Varta
183 Views

मुंबई: स्वतःला दैवी शक्ती लाभल्याचा दावा करून भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नाशिकच्या स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक एकनाथ खरात उर्फ कॅप्टन यांच्या अडचणीत मोठी भर पडली असून अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात तब्बल ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये ४२.८८ कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगचा गंभीर आरोप करण्यात आला असून अशोक खरात यांच्यासह त्यांची पत्नी कल्पना खरात आणि अन्य तीन जणांना आरोपी करण्यात आले आहे. तपासादरम्यान नोंदविण्यात आलेले ३७ साक्षीदारांचे जबाब, विविध बँक व्यवहारांची कागदपत्रे आणि अन्य दस्तऐवजी पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.

ईडीच्या तपासानुसार, अशोक खरात यांनी मंत्र-तंत्र, अघोरी उपचार आणि दैवी शक्तींचे आमिष दाखवून अनेक भक्तांकडून कोट्यवधी रुपये उकळले असून या पैशांचा स्रोत लपविण्यासाठी तब्बल १४२ बनावट किंवा प्रॉक्सी बँक खात्यांचा वापर करून व्यवहार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यासह विविध ठिकाणी दाखल झालेल्या फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने हा तपास सुरू केला होता. या मूळ गुन्ह्यांतून मिळालेल्या रकमेचे आर्थिक व्यवहारांद्वारे शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला असून ईडीने यापूर्वीच या प्रकरणात सुमारे १९.२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. आता आरोपपत्र दाखल झाल्याने या प्रकरणाच्या सुनावणीला वेग येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Total Visitors :
4565609
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *