“विद्यार्थी आंदोलनावर संवादातून तोडगा काढा”- अण्णा हजारे

Gramin Varta
111 Views

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र पाठवून केले आवाहन

नवी दिल्ली: समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर तरुणांच्या चिंता गांभीर्याने घेतल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.

अण्णा हजारे यांनी बुधवारी लिहिलेल्या पत्रात दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेली हिंसा आणि पोलिसांची कारवाई अत्यंत वेदनादायक असल्याचे नमूद केले. लोकशाही व्यवस्थेत संघर्षापेक्षा संवाद हा नेहमीच चांगला मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले.

हजारे यांनी मंत्री स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त केली. एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकार कमकुवत होत नाही, उलट यामुळे इतर मंत्र्यांमध्येही उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते आणि प्रशासन अधिक प्रभावी बनते, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रात अण्णा म्हणाले की, जबाबदारी निश्चित करून एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यास सरकारची शक्ती कमी होणार नाही. उलट इतर मंत्र्यांना स्पष्ट संदेश मिळेल की आपल्या विभागाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही तर पद सोडावे लागू शकते असा संदेश जाईल.

नीट परीक्षेतील कथित अनियमितता, प्रश्नपत्रिका फुटणे, भरती प्रक्रियेतील विलंब आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांमुळे देशातील लाखो विद्यार्थी चिंतेत असल्याचे हजारे यांनी सांगितले. या समस्यांकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय म्हणून न पाहता जनतेच्या वेदना म्हणून पाहिले पाहिजे. यापूर्वी 2024 मध्ये देखील नीटची प्रश्नपत्रिका फुटणे आणि गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले होते. यावर्षीही सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेबाबत अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत. कथित अनियमितता आणि पुनर्परीक्षेच्या निकालामुळे निराश झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांबाबतही अण्णांनी चिंता व्यक्त केली.

कोणत्याही घोटाळ्यात किंवा अनियमिततेत अनेकदा जबाबदारी खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांवर निश्चित केली जाते, मात्र सकारात्मक परिणामांचे श्रेय सरकारकडून घेतले जाते. अंतिम जबाबदारी ही उच्च पदांवर असलेल्या व्यक्तींची असते, असे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थी आणि पालक गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. सरकारने या आंदोलनाकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता जबाबदारीने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

अण्णा हजारे यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचाही उल्लेख करत, कोणताही अर्थपूर्ण संवाद न साधता त्यांना उपोषण स्थळावरून हटवण्यात आल्याचे म्हटले. दीर्घकाळ आंदोलन सुरू असूनही सरकारकडून कोणताही प्रतिनिधी किंवा वरिष्ठ अधिकारी आंदोलकांशी चर्चेसाठी आला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकशाहीत संघर्षापेक्षा संवाद नेहमीच चांगला असतो, असे हजारे यांनी पत्रात नमूद केले आहे. जनतेचा आवाज हा राजकीय विरोधकांचा आवाज म्हणून पाहू नये, असे आवाहन त्यांनी पंतप्रधानांना केले.सरकारने संयमाने आंदोलकांचे म्हणणे ऐकावे, विश्वास निर्माण करावा आणि गांधीवादी तत्त्वे व लोकशाही मूल्यांच्या आधारे संवादातून मतभेद सोडवावेत, असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे.

Total Visitors :
4575671
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *