दिल्ली: जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान काही आंदोलक मुलांकडून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली असून, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या स्वर्गीय मातेलाही लक्ष्य करण्यात आले होते. या प्रकारानंतर शुक्रवारी उशिरा रात्री प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत देशाचे मन हेलावून टाकणारे भावनिक विचार मांडले आहेत. जंतरमंतरवर घडलेला हा प्रकार देश आणि जगाने पाहिला असून, कोणत्याही सभ्य समाजाला अशोभनीय वाटतील अशा अत्यंत घाणेरड्या शब्दांचा वापर या मुलांनी केल्याचे सांगत, लहान वयात चुका होतात आणि त्या सुधारण्याची संधीही याच वयात असते असे पंतप्रधान म्हणाले.
समाजात निर्माण झालेला रोष आणि हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्का असल्याचे आपण समजू शकतो, आपल्याच देशातील मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली; परंतु या मुलांना शिक्षा देण्यापेक्षा किंवा न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावण्यापेक्षा त्यांना मिठीत घेऊन योग्य रस्ता दाखविणे हीच आपली खरी जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत त्यांनी या मुलांना माफ करत असल्याचे जाहीर केले. कधीकधी आपल्याच दाताखाली आपली जीभ येते आणि रक्त येते, तरीही आपण आपले दात तोडून टाकत नाही, कारण दात आणि जीभ दोन्ही आपलेच असतात, त्याचप्रमाणे ही मुलेही आपलीच आहेत, त्यामुळे भरकटलेल्या मुलांना योग्य रस्ता दाखवणे कठीण असले तरी हे कठीण काम आपल्याला करायचेच आहे, असे आवाहन त्यांनी समाजाला केले.
तसेच या मुलांनीही आपल्या चुकांपासून शिकावे, एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी पुढे जावे आणि नवीन स्वप्ने साकार करावीत, कारण मी तुमच्यासाठी जगतोय आणि तुमच्या भविष्यासाठीच स्वतःला झटवत आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी सर्वांना देश पुढे नेण्यासाठी एकत्र येण्याचे भावनिक आवाहन केले आहे.






