शृंगारतळीत तरुणांच्या दोन गटांत रॉडने तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल, गुहागरात संताप

Gramin Varta
747 Views

गुहागर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे शुल्लक कारणावरून तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट रॉडच्या साहाय्याने झालेल्या तुफान हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेमुळे गुहागर परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, काही तरुण दारू पित असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि एका गटाने दुसऱ्या गटातील तरुणांवर लोखंडी रॉडने हल्ला चढवला.

व्हिडिओमध्ये मारहाण होत असलेल्या दोन तरुणांपैकी एक जण “माझी काहीही चूक नाही, मी काय केलं आहे ते तरी सांगा,” अशी विनवणी करत असल्याचे ऐकू येत असतानाही त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे.

या घटनेमुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या काही तरुणांकडून वाढत चाललेला बेफामपणा आणि हिंसक प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली असून, अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मारहाण करणारे तरुण नेमके कोण आहेत, याचा शोध गुहागर पोलीस प्रशासनाने सुरू केला असून, व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे संबंधितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

भररस्त्यात झालेल्या या थरारक मारहाणीप्रकरणी गुहागर पोलीस कोणती कारवाई करतात, दोषींवर कठोर गुन्हे दाखल होतात का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4630117
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *