लाखो रुपये खर्चूनही गुहागरची वैकुंठभूमी वापराविना; पावसात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ

Gramin Varta
125 Views

गुहागर: शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लाखो रुपये खर्च करून उभारलेली अत्याधुनिक वैकुंठभूमी प्रशासकीय दिरंगाई आणि ठेकेदाराच्या ढिलाईमुळे गेल्या दोन वर्षांपासून वापराविना धूळ खात पडली आहे. यामुळे नागरिक संतप्त असून, भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ गुहागरवासियांवर आली आहे.

समुद्र चौपाटीलगत उभारलेल्या या वैकुंठभूमीमध्ये चार शवदाहिन्या, लाकूड साठवण्यासाठी गोडाऊन आणि प्रशस्त सभागृह अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संपूर्ण इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही केवळ शवदाहिन्यांच्या कामातील विलंबामुळे या वास्तूचा उपयोग सर्वसामान्यांसाठी होऊ शकलेला नाही. पंधराव्या वित्त आयोगातून चार शवदाहिन्यांसाठी सुमारे तीन लाख ९८ हजार रुपयांची निविदा काढण्यात आली होती. मात्र, ठेकेदाराने निविदेतील अटींनुसार दर्जाचे साहित्य न आणल्याने हे काम रेंगाळले आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य आणल्यामुळे ते परत पाठवण्यात आले, परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून काम ठप्प आहे.

शहरात विकासकामे नोंदणीकृत ठेकेदारांना दिली असली तरी, अनेक ठिकाणी पोट-ठेकेदारांकडून कामे करून घेतली जात असल्याने कामाचा दर्जा राखला जात नाही आणि विलंबही होतो, असा आरोप नागरिक करत आहेत. सध्या रंगरंगोटी करून चकाचक केलेली ही वास्तू केवळ शोभेची वस्तू ठरत असून, प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे गुहागरवासियांची मोठी गैरसोय होत आहे. याप्रकरणी तातडीने लक्ष देऊन शवदाहिन्यांचे काम मार्गी लावावे आणि नागरिकांची ही हेळसांड थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Total Visitors :
4576134
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *