‘मृत्यू समोर उभा… पण देवदूत ठरले पोलीस!’ पायावर मोठा दगड कोसळून अडकलेला पर्यटक सुखरूप बचावला

Gramin Varta
571 Views

रायगड : पेब किल्ल्यावर ट्रेकिंगचा थरार अनुभवण्यासाठी गेलेल्या एका तरुणासाठी काही क्षणांतच तो जीवघेणा ठरला. पायावर प्रचंड मोठा दगड कोसळल्याने तो डोंगरात अडकून पडला. हालचालही अशक्य झालेल्या या पर्यटकाने अखेर पोलिसांना मदतीचा धावता संदेश दिला. नेरळ पोलिसांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेत शिताफीने दगड बाजूला करून त्याची सुखरूप सुटका केली. या धाडसी बचावकारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहन जिनोरस कदम (वय २५, रा. ठाणे) हा रविवारी पेब किल्ला परिसरातील आनंदवाडी येथे ट्रेकसाठी गेला होता. ट्रेकदरम्यान अचानक त्याच्या पायावर मोठा दगड पडला. दगडाचे वजन इतके जास्त होते की, स्वतःच्या प्रयत्नाने तो पाय बाहेर काढू शकत नव्हता. डोंगराळ भागात मदतीची कोणतीही सोय नसल्याने त्याने तातडीने नेरळ पोलिसांशी दूरध्वनीवर संपर्क साधला.

माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई कनके आणि महाकाल यांनी क्षणाचाही विलंब न करता फणसवाडी येथील स्थानिक नागरिकांची मदत घेत घटनास्थळी धाव घेतली. अवघड डोंगररस्ता पार करून त्यांनी पर्यटकापर्यंत पोहोचत शिताफीने त्याच्या पायावरील मोठा दगड हटवला आणि त्याची सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्याला आवश्यक ती प्राथमिक उपचारांची मदत देण्यात आली.

नेरळ पोलिसांच्या तत्परता, धाडस आणि वेळेवर केलेल्या बचावकारवाईमुळे संभाव्य गंभीर दुर्घटना टळली. या कामगिरीबद्दल पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले.

दरम्यान, पावसाळ्यात डोंगराळ भागात ट्रेकिंग करताना विशेष काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हवामानाचा अंदाज, घसरडे रस्ते, सैल दगड आणि आवश्यक सुरक्षा साहित्याचा वापर याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

वेळेवर मिळालेली मदत आणि पोलिसांची तत्परता यामुळे एका तरुणाचा जीव वाचला; अन्यथा पेब किल्ल्यावर आणखी एका दुर्दैवी घटनेची नोंद झाली असती.

Total Visitors :
4630063
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *