चिपळूण : कुडप गावात गवा रेड्यांची वाढती वर्दळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Gramin Varta
91 Views

सावर्डे/विनायक सावंत: चिपळूण तालुक्यातील सावर्डे नजीकच्या कुडप गाव परिसरात मुख्य मार्गालगत तसेच रहदारी वस्तीच्या ठिकाणी गवा (भारतीय बायसन) रेड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस गवा रेड्यांचे कळप मानवी वस्तीजवळ येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही दिवसां पासून गवा रेडे भातशेतीसह इतर पिकांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वर्षभर कष्ट करून उभी केलेली शेती काही तासांत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गवा रेड्यांच्या पायदळी अनेक ठिकाणी भात पिकांचे नुकसान झाले असून इतर नगदी पिकांनाही फटका बसत आहे.

विशेष म्हणजे, गवा रेडे मुख्य रस्त्यालगत आणि वस्तीच्या अगदी जवळ दिसत असल्याने, तसेच वालावलकर रुग्णालय डेरवण, वैद्यकीय महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, नर्सिंग कॉलेज जवळच लगत असल्याने शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळी व सायंकाळी नागरिकांना घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी लागत आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन एखादा अनर्थ टाळण्यासाठी, गवा रेड्यांचा वावर नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

Total Visitors :
4630017
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *