50 फूट दरीत कोसळली कार; एका झाडाने वाचवला जीव, अन्यथा ‘मिसिंग लिंक’वर झाला असता भीषण अनर्थ!

Gramin Varta
264 Views

सुदैवाने चालक बचावला

रायगड :  खालापूर तालुक्यात जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील बोरघाट परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या एका थरारक अपघातात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मिसिंग लिंक परिसराजवळ भरकटलेली कार सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. मात्र, दरीतील एका झाडाला कार अडकल्याने चालकाचा जीव वाचला. अन्यथा ही कार थेट खाली असलेल्या मिसिंग लिंकच्या केबल ब्रिजवर कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहित भटनागर (वय 59) हे पर्यटनासाठी खालापूर परिसरात आले होते. मिसिंग लिंकवरील पूल आणि परिसर पाहण्याच्या उद्देशाने ते टेकडीवरील कच्च्या रस्त्याने स्कोडा कार (क्रमांक MH 04 FK 7143) घेऊन पुढे गेले. मात्र, रस्त्याचा अचूक अंदाज न आल्याने कार भरकटली आणि दलदलीच्या भागात घसरून थेट दरीत कोसळली.

सुदैवाने सुमारे 50 फूट खाली असलेल्या झाडांमध्ये कार अडकली. त्यामुळे आणखी खोल दरीत कोसळण्यापासून कार थांबली आणि मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दरीत उतरून कारमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. जवळपास अर्धा तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

या अपघातात चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त कार झाडाला अडकली नसती, तर ती थेट मिसिंग लिंकच्या केबल ब्रिजवर कोसळण्याची शक्यता होती, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली असून खोपोली पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. ही घटना पुन्हा एकदा डोंगराळ भागातील कच्च्या आणि अपरिचित मार्गांवर वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित करणारी ठरली.

Total Visitors :
4630053
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *