चिपळूण : तालुक्यातील वहाळ येथे उद्या मंगळवार, दिनांक ४ ऑगस्ट रोजी एका विशेष सामाजिक उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लब सावर्डे आणि आयडियल संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडत असून, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये आणि संभाव्य आजारांवर वेळीच नियंत्रण मिळवता यावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. वहाळ येथील श्री गणेश क्लिनिकमध्ये सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत हे शिबिर होणार असून, डॉ. अजित गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची टीम रुग्णांची तपासणी करणार आहे.
बदलती जीवनशैली आणि फास्ट फूडच्या सेवनामुळे बहुतांश नागरिक ताणतणाव तसेच विविध शारीरिक समस्यांनी त्रस्त असतात. या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसिक ताणतणाव, सांधेदुखी, पित्ताचा त्रास, थायरॉईड आणि नेत्ररोग यांसारख्या आजारांची सखोल तपासणी केली जाणार आहे. शिबिरादरम्यान नागरिकांची ईसीजी, रँडम शुगर आणि रक्तदाब तपासणी पूर्णपणे मोफत केली जाईल, तसेच उपस्थितांना तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला व आहाराविषयी मार्गदर्शन लाभणार आहे. विशेष म्हणजे, गरज भासल्यास रुग्णांना सवलतीच्या दरात औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सावर्डे परिसरासह पंचक्रोशीतील नागरिक, जेष्ठ नागरिक, शालेय कर्मचारी, तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजित गावकर यांनी केले आहे. शिबिराविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा नावनोंदणी करण्यासाठी नागरिकांनी डॉ. अजित गावकर यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.





