गोवा–मुंबई प्रवासात महिलेचा दोन वेळा विनयभंग; चालत्या बसमधून 112 वर फोन, कोलाडमध्ये बस अडवून आरोपीवर गुन्हा

Gramin Varta
632 Views

रायगड : गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये महिला प्रवाशासोबत गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, प्रवासादरम्यान बसमधील एका कर्मचाऱ्याने तिचा दोन वेळा विनयभंग केला. प्रसंगावधान राखत महिलेने चालत्या बसमधून 112 या आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधल्यानंतर रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे पोलिसांनी बस अडवून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-43-सीके-2981 क्रमांकाची राजधानी ट्रॅव्हल्स बस गोव्याहून मुंबईकडे निघाली होती. याच बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेने बसमधील कर्मचाऱ्याविरुद्ध गैरवर्तनाची तक्रार केली. बस रायगड जिल्ह्यातील पोलादपूर परिसरात आल्यानंतर महिलेने 112 हेल्पलाइनवर संपर्क साधून मदत मागितली.
त्यानंतर कोलाड पोलिसांनी तातडीने कारवाई करत बस थांबवली. महिलेची सविस्तर माहिती नोंदवून तिच्या तक्रारीच्या आधारे आरोपी होशियार डिगर सिंग कार्की (रा. उत्तराखंड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास कोलाड पोलीस करत आहेत.
दरम्यान, या घटनेवरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेमुळे खासगी ट्रॅव्हल्समधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :
4630053
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *