रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश वारीची सुवर्णसंधी : युरोप-चीन अभ्यास दौऱ्यासाठी २ लाखांपर्यंतचे अनुदान, १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Gramin Varta
151 Views

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी परदेशात जाऊन आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली असून, २०२६-२७ या वर्षासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ या राज्य पुरस्कृत योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरोप आणि चीन देशांच्या कृषी अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी मिळणार असून, या दौऱ्यासाठी शासनाकडून दोन लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.

शेतीमध्ये केवळ उत्पादन वाढविण्यावर समाधान न मानता, जागतिक स्तरावर होत असलेले बदल व विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतीमालाचा दर्जा सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण पाच शेतकऱ्यांचा लक्षांक निश्चित करण्यात आला असून, यामध्ये एका महिला शेतकऱ्याचा, एका केंद्र किंवा राज्य स्तरावरील कृषी पुरस्कार प्राप्त अथवा पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्याचा आणि तीन इतर शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे.

निर्धारित लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरावर लॉटरी काढून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी किमान २५ वर्षे पूर्ण असावे तसेच उत्पन्नाचे मुख्य साधन शेतीच असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकरी कोणतीही शासकीय, निमशासकीय किंवा खासगी नोकरीत नसावा आणि डॉक्टर, वकील, सीए किंवा अभियंता नसला पाहिजे. अर्ज करताना शेतकऱ्यांकडे किमान एक वर्ष वैध मुदत असलेला पासपोर्ट असणे बंधनकारक आहे. शेतकरी कुटुंबातून केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार असून, स्वखर्चानेही कुटुंबातील इतर सदस्याला सोबत नेण्यास परवानगी असणार नाही. तसेच शेतकऱ्याचे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आणि यापूर्वी कोणत्याही शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थसहाय्याने परदेश दौरा केलेला नसणे बंधनकारक आहे. शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक असून, निवड झाल्यानंतर एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र व कोरोना तपासणी अहवाल द्यावा लागणार आहे.

इच्छुकांनी चालू कालावधीचा सातबारा व आठ अ उतारा, ओळखपत्र व रेशन कार्डची प्रत, वैध पासपोर्टची प्रत आणि डॉक्टरांचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र या कागदपत्रांसह आपले अर्ज १७ ऑगस्ट २०२६ पूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

- Advertisement -

Total Visitors :
4630023
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *