गुहागर: कुटगिरी येथे लोखंडी पूल कोसळला; १० ते १२ गुरे पुलाखाली अडकली

Gramin Varta
295 Views

एक बैल दगावल्याची प्राथमिक माहिती

गुहागर : तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी पूल सोमवारी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. पूल कोसळत असतानाच त्यावरून जात असलेली सुमारे १० ते १२ गुरे पुलाखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दिलीप गुरव यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, इतर जनावरे लोखंडी गर्डरखाली अडकली असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ दिलीप खेतले यांनी दिली.

घटना घडताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच पुलाचे जड लोखंडी साहित्य जनावरांवर कोसळल्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. काही ग्रामस्थ नदीत उतरून जनावरे वाचविण्याचा प्रयत्न करत असले तरी लोखंडी संरचना हटविल्याशिवाय अनेक जनावरांना बाहेर काढणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, तहसीलदार तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कळविण्यात आले असून संबंधित अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. आवश्यक यंत्रसामग्रीसह जेसीबी मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा लोखंडी पूल सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच पुलाचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. नवीन पुलासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून अधिकारी नुकतेच पाहणी करून गेले होते. मात्र त्याआधीच हा पूल कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या पुलावरून गावातील नागरिक, शेतकरी आणि जनावरे नियमितपणे ये-जा करत होते. गावाच्या पलीकडे शेती असल्याने तसेच स्मशानभूमीकडे जाण्यासाठीही हाच मार्ग महत्त्वाचा होता. पर्यायी रस्ता नसल्यामुळे याच पुलावर संपूर्ण गाव अवलंबून होते. पूल यापूर्वीही धोकादायक झाल्यानंतर ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चातून जेसीबीच्या साहाय्याने तो उचलून वेल्डिंग करून तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा नवीन पुलाबाबत आवश्यक कार्यवाही न झाल्याने अखेर ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, बचावकार्य सुरू असून पुलाखाली अडकलेल्या सर्व जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Total Visitors :
4630023
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *