गुहागर : तालुक्यातील कर्दे गावाजवळ मुंबई–दोडवली या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी घडला त्यावेळी एसटी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. बसमध्ये केवळ चालक आणि वाहक हे दोघेच उपस्थित होते.
या अपघातात चालक आणि वाहक या दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आहेत. सध्या या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सध्या पुढील तपास सुरू आहे.





